इंदापूर, (पुणे) : इंदापूर तालुक्यतील पळसदेव, माळवाडी आणि शेलार पट्ट्यातील पाच शेतकऱ्यांनी मक्याच्या पिकात आंतरपीक म्हणून थेट सामूहिक अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
अंदाजे दीड एकर क्षेत्रावर ही अफूची झाडे असून, त्यांची एकूण किंमत व अफूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे अद्यापी समजू शकली नाहीत. रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिसांकडून या अफूच्या शेतीची पाहणी सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या अफूची पूर्ण वाढ झाली असून, त्याची बोंडेदेखील वर आली आहेत. मात्र, तरीही ही अफूची शेती कोणाच्याच नजरेस पडली नाही. दरम्यान, पोलिसांना गुरुवारी (ता. ०२) दुपारी या शेतीचा सुगावा लागला आणि तब्बल दीड एकरातील ही अफूची शेती आढळून आली आणि एकच खळबळ उडाली.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिस या शेतीची पाहणी करीत होते. या अफूची एकूण किंमत समजली नाही. यापैकी पळसदेव जवळच्या मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून केलेली अफूची शेती ही पोलिसांचेही डोळे विस्फारणारी ठरली. संबंधित शेतकऱ्यांना ही अफूची शेती चांगलीच महाग पडण्याची शक्यता आहे.