पुणे : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला संपन्न झाला. अवघ्या अडीच दिवसात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २- ०ने विजयी आघाडी घेतली.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ १ विकेट गमावत ६२ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. त्यांचे ४ फलंदाज तर एकाच धावसंख्येवर तंबूत परतले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ३१.१ षटकात ११३ धावांवर संपुष्टात आला.
भारताच्या दुसऱ्या डावात ११५ धावांचा पाठलाग करताना सुरुवात फार चांगली झाली नाही. अवघ्या ६ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. राहुल केवळ एकच धाव काढू शकला. त्यानंतर रोहित शर्माने मोठे फटके मारत भारताचा डाव पुढे नेला. मात्र ३९ धावांवर रोहित धावबाद झाला. त्याने ३१ धावा केल्या ज्यात ३ चौकार तर २ षटकारांचा समावेश होता.
विराट कोहलीला देखील फार काही करता आले नाही. २० धावा करून तो बाद झाला तर श्रेयस अय्यर मोठा फटका मारताना १२ धावा करून बाद झाला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या पुजाराने संयमी खेळी दाखवत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. त्याने ३१ धावा केल्या. यष्टीरक्षक केएस भरतने २३ धावा करून दोन्ही नाबाद राहिले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४६ चेंडूत ४३ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लाबुशेन याने ३५ धावांचे योगदान दिले. यावेळी इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. लाबुशेन, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकाँब आणि कर्णधार पॅट कमिन्स हे चार खेळाडू ९५ धावसंख्येवर बाद झाले.