पुणे : नवीन वर्षात पोलीस दलातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. वानवडीमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्रीडा स्पर्धेचे (रेसलिंग कल्स्टर) उद्घाटन सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध संघाने मानवंदना दिली. त्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारे आणि वंदना जाधव तसेच महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी सेठ बोलत होते.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद, एस जयकुमार, अनूप कुमार, अभिषेक त्रिमुखे, दीपक साकोरे, प्रवीण पाटील, नम्रता पाटील आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना रजनीश सेठ म्हणाले, ” या स्पर्धेमुळे पोलीस दलातील खेळाडूंचे मनोबल उंचावेल. त्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार होतील. नव्या वर्षात जानेवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा होणार असून त्यासाठी पोलीस दलातील खेळाडूंना खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.”
दरम्यान, या स्पर्धेत कुस्ती, कबड्डी, मुष्टियुद्ध, पंजा कुस्ती, पॉवरलिफ्टिंग, भारत्तोलन, शरीरसौष्ठव अशा विविध सात क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेत १५९६ पुरुष खेळाडू आणि ६३२ महिला खेळाडू सहभागी झाले आहेत.