सोलापूर : चारित्र्याचा संशय घेत एका मुस्लीम तरुणाने त्यांच्या पत्नीस तोंडी तलाक देत डोक्यावरील संपूर्ण केस कापून विद्रूप करण्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर येथे घडला आहे. याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी मुस्लीम महिला संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक बंदीनंतरही विवाहितेवर अत्याचार करत तोंडी तलाक देण्याच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सुमय्या कलीम चौधरी (वय २०) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती कलीम सत्तार चौधरी, सासू रजिया सत्तार चौधरी आणि सासरे सत्तार चौधरी (रा. फैजुलबारी मशिदीजवळ, राजेंद्र चौक, सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुमय्या हिचा विवाह मे २०२२ रोजी झाला होता. पती हा फुलांचा व्यवसाय करतो. सासरी नांदण्यास आल्यानंतर लगेचच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. फुलांचा व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून येण्यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. तसेच चारित्र्याचा संशय देखील घेत होता.
तीन महिन्याअगोदर पतीने एका कटिंग दुकादाराला घरी बोलावून माझे संपूर्ण केस कापले व टक्कल केले. पती कलीम याने पत्नी सुमैया या दोघांत घरगुती कारणावरून २२ दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पती याने तोंडी तीन वेळा तलाख दिला आणि माहेरी आणून सोडले.
दरम्यान, कलीम चौधरी व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पती कलीम याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर मंगळवारी दिवसभर पोलिसांनी सर्व बाबी तपासून, सुमैया याची फिर्याद लिहून घेतली आणि जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पीएसआय राठोड करत आहेत.