युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : जांबूत (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बेपत्ता असलेल्या इसमाचा शिर व एक हात धडापासून वेगळा असलेला मृतदेह आढळून उसाच्या फडात आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला असावा किंवा घातपात की अपघात अशी उलट – सुलट चर्चा नागरिकांसह पोलीस बांधत आहेत. हि घटना गुरुवारी (ता. ०२) दुपारी उघडकीस आली आहे.
सचिन बाळू जोरी (वय ३६, रा. जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते जांबूत येथील आदर्श विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबूत येथील आदर्श विद्यालयात सचिन जोरी हे लिपिक म्हणून कार्यरत होते. जांबुत गावाजवळच त्यांचे शेत असल्याने पायी शेतात जात असत. शनिवारी सकाळची शाळा करून ते शेतात फेरफटका मारायला गेले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी घरी न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मिळून न आल्याने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत फिर्याद दिली.
गुरुवारी (ता. ०१) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताच्या बाजूलाच शोध घेतला जात असताना उसाच्या शेतातून दूर्गंधी आल्याने जमावातील काहींना संशय आला. तेव्हा उसाच्या फडात शोध घेतला असता जोरी यांचा छिन्नविछीन्न अवस्थेतील मृतदेह दिसून आला. सहा दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. डोके आणि एक हात धडापासून वेगळे पडलेले होते.
दरम्यान, ही घटना कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, शिरूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, दुपारी उसात ज्यांनी मृतदेह पाहिला त्यांच्या मते मृतदेहाजवळ बिबट्यासदृष प्राण्याच्या पायाचे ठसे होते. बिबट्याच्या हल्ल्यातच या व्यक्तीला प्राण गमवावे लागले असल्याच्या शक्यतेला पोलिसांनीही दूजोरा दिला आहे. सायंकाळी उशिरा, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.