शिक्रापूर : एका नराधम बापाने आपल्याच मुलीला वेळ नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनाव रचत खून केला होता. या मुलीचा मृतदेह पोलिसांनी कसून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. अखेर चौथ्या दिवशी रविवारी या मुलीचा मृतदेह शिक्रापूर पोलिसांना वेळ नदीच्या बंधाऱ्यामध्ये मिळून आला आहे.
अपेक्षा सोळुंके या बालिकेचा तिच्याच नराधम बाप युवराज सोळुंके याने मंगळवारी (ता. २८) खून केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी बापाला बेड्या ठोकल्या, मात्र वेळ नदीला अचानक पूर आल्याने मुलीचा मृतदेह शोधण्यात अडचण निर्माण होत होत्या.
शिक्रापूर पोलिसांनी तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी येथे जात स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलीचा मृतदेह मिळत नव्हता.
रविवारी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन अतकरे, रणजित पठारे, हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलिस नाईक अमोल दांडगे, रोहिदास पाखरे, लखन शिरसकर यांसह काही जवानांच्या मदतीने शिक्रापूर वेळ नदीमध्ये शोधमोहिम राबवली होती.
दरम्यान, बाजार मैदानाच्या पुढे महाबळेश्वरनगर नजीक बंधाऱ्यात बेपत्ता अपेक्षाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.