खेड, रत्नागिरी : मला बारावीच्या अभ्यासात काहीच रस नाही, मला आयटीआय मध्ये शिक्षण घ्यायचे आहे, परंतु, ही गोष्ट मी घराच्या लोकांना सांगू शकत नाही, यामुळेच मी स्वतः:च्या अपहरणाचा बनाव रचला, अशी कबुली अल्पवयीन मुलाने दिली. ही घटना खेड, रत्नागिरी येथील असून मुलाच्या कबुली जबाबामुळे पोलीस आणि पालक देखील सुन्न झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील खेड पोलीस स्टेशनमध्ये ९ नोव्हेंबर रोजी एका व्यकतीने आपला १७ वर्षांचा पुतण्याचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविण्यापूर्वी पालकांनी मुळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मुलाने घरच्याना ‘मला चोरामणी पकडून दुसऱ्या जिल्ह्यात नेले होते, मात्र मी कशीबशी माझी सुटका करून घेतली. आता मी एका ठिकाणी आश्रयासाठी थांबलो आहे’ अशी माहिती दिली. त्यानंतर मुलाशी संपर्क होऊ न शकल्याने पालकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली.
रत्नागिरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलून मुलाची शोध मोहीम सुरु केली. आजूबाजूच्या जिल्ह्यात रत्नागिरी पोलिसांची पथके दाखल झाली. रात्रीतून मुलाला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर शोधलेल्या मुलाशी पोलिसांनी संवाद साधला असता, वरील धक्कादायक माहिती समोर आली.
तोपर्यंत असे प्रकार नक्कीच घडू शकतील…
स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच आपल्या पाल्याने दर्जेदार शिक्षण घेऊन समाजात सन्मानाने टिकून राहावे, असे वाटते. मात्र, यात अनेकदा पालक मुलांचा शैक्षणिक कल कोणत्या बाजूला आहे, हे स्वतःच ठरवतात. परंतु अशी मुले स्वतः: आपल्या करियरकडे खूप गांभीर्याने पाहतात. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची शैक्षणिक शाखा निवडू दिली, तर हेच मुले भविष्यात नक्कीच पालकांचे नाव उज्ज्वल करू शकतील. जोपर्यंत मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडू दिले जाणार नाहीत, तो पर्यंत असे प्रकार नक्कीच घडू शकतील.