नाशिक : नाशिक शहरातील देवळाली परिसरात गुरुवारी सायंकाळी शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले, बाचाबाची झाली, त्यानंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.
देवळाली गावात शिवजयंतीसाठी कोणते कार्यक्रम घ्यायचे, याबाबतचे नियोजन सुरु होते. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ग्रामस्थ, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांचीच उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षपदावरून शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद-विवादाच्या फेऱ्या झाल्या. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर बाचाबाचीला सुरुवात झाली आणि त्यांचेच रूपांतर गोळीबारात झाले.
यावेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचे सुपुत्र स्वप्नील यांनी बंदूक काढून थेट हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने तातडीने बंद केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतले.
उपनगर पोलिस ठाण्यात स्वप्निल लवटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल लवटे हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या आहे. डिसेंबर २०२२ मध्ये माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.