विशाल कदम
लोणी काळभोर, ता. १२ : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत तब्बल ८ एकर ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नायगाव (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता.१०) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
पोपट सोनबा चौधरी (वय-५०) व विलास सोनबा चौधरी (वय-४३, दोघेही रा.नायगाव. ता. हवेली) असे नुकसान झालेल्या दोन सख्ख्या शेतकरी भावंडांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोपट चौधरी व विलास चौधरी यांनी नायगाव ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर 446, 447, 449, 479 मध्ये शेती आहे. या क्षेत्रातून महावितरणची वीजवाहक तारा गेल्या आहेत. या शेतीमध्ये दोघा भावंडांनी ऊस उत्पादन घेतले आहे. या दोघांच्या शेतात गाळप आणि तोडणीच्या अंतिम टप्प्याच्या प्रतिक्षेत उभा होता.
मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या फडात पडल्या. त्यानंतर आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये ८ एकर ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्याचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
सहा महिन्यात ऊसाला तीनदा आग
‘मागील सहा महिन्यांच्या कालावधीत ऊसाला शॉर्टसर्किटमुळे तीनदा आग लागली आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी तक्रार केली आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्या शेतातील ८ एकर ऊस जळून माझे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पोपट चौधरी यांनी केली आहे.
…तर शेतकऱ्याला मोबदला दिला जाणार
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्याशी संवाद केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निरीक्षकाला कळविली आहे. विद्युत निरीक्षक घटनास्थळी येऊन पंचनामा करतील. त्यानंतर आगीचे कारण समोर येईल. या घटनेत जर शॉर्टसर्किटमुळे आग लागली असेल तर महावितरण कंपनीच्या नियमानुसार शेतकऱ्याला मोबदला दिला जाईल’, असे उरुळी कांचन महावितरणचे उपविभागीय अधिकारी धम्मपाल पंडित यांनी सांगितले.
महावितरणकडून तातडीने उपाययोजनांची गरज
पूर्व हवेतील शेतकऱ्यांच्या शेतातून अनेक धोकादायकरित्या लघुदाब विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी तारा खाली किंवा धोकादायकरित्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. यावर महावितरण कंपनीने त्वरित उपयोजना करून त्या तारा सुस्थितीत कराव्यात. जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवित अथवा शेतकऱ्याची वित्तीहानी होणार नाही. यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.