सासवड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सासवड पोलिसांनी अवघ्या १८ तासात अटक केली आहे.
अनिता महेश बनकर (रा. माळशिरस, ता.पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती महेश पंडीत बनकर (वय २४) व सासू कमलाबाई पंडीत बनकर, (वय ४५, दोघेही रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. सध्या अंजलीनगर, कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघापुर रोडवरील आंबोडी फॉरेस्टमध्ये एक महिला जखमी अवस्थेत पडलेली असून तिचे कपडे रक्ताने भरलेले असून तिच्या जवळ २ वर्षाचे लहान मुल रडत बसले आहे, अशी प्राथमिक माहिती सासवड पोलिसांना शनिवारी (ता.२५) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमी महिलेला व लहान मुलास अॅम्बुलन्समधुन सासवड रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी महिलेचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांना सुरवातीला अनोळखी महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते. परंतु तिच्याजवळील पिशवीत एक चिठठी सापडली त्यावर नाव व मोबाईल नंबर होता. त्यावर फोन करून माहिती घेतली असता महिलेचे नाव अनिता महेश बनकर असल्याची ओळख पटली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पती महेश व मयत पत्नी अनिता यांचेत कौटुंबिक वाद असून ते एकमेकांपासुन वेगळे राहत आहेत. आरोपी महेश बनकर याचा शनिवारी (ता.२५) सायंकाळी सहा वाजल्यापासून फोन बंद येत होता. यामुळे सासवड पोलिसांना संशय आला की खुन तिचा पती महेश बनकर यानेच केला असावा.
दरम्यान, मयत अनिता यांच्या नातेवाईकांनी अनिता यांचे पती महेश बनकर यानेच खून केला आहे. तसेच लग्न झाल्यापासुन अनिता हिला पती महेश बनकर व सासु कमलाबाई बनकर हे चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरीक, मानसिक त्रास देत होते, अशी तक्रार सासवड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार ससवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी तात्काळ सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली कि, आरोपी महेश बनकर हा नायगांवच्या कडून पांढऱ्या रंगाच्या स्कुटी मोटार सायकलवरून चालला आहे.
पोलीस तातडीने नायगावकडे गेले असता, आरोपी हॉटेल आकाश समाधानच्या समोर आढळून आला. आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी महेश बनकर यांची चौकशी केली असता, त्याने पत्नीचे वागणे बरोबर नव्हते, तसेच नको त्या लोकांशी ती बोलत असल्याचे सांगितले. ती माझे देखील ऐकत नव्हती. यामुळेच तिला गोड बोलून पुण्यातून मोटारसायकलवर बसून सासवड येथे घेऊन आलो व जंगलात नेवून पत्नीचा चाकूने गळा कापून खून केला, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली.
सदर कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे, प्रतिक धिवार, सुनिल कोळी (सायबर पोलीस स्टेशन), पोलीस मित्र सचिन चंदनशिव आणि शुभम घोडके यांच्या पथकाने केलेली आहे.