दिनेश सोनवणे
दौंड : पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे मात्र पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने अवैध धंदे हे कोणाच्यातरी आशीर्वादाने चालू आहेत. असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीय करू लागले आहेत.
मागील काही दिवसांपासून दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा, मटका, जुगार, हाताभट्टी यासह अनेक अवैध धंदे जोमात सुरु आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे शहर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळे खुलेआम सुरु असताना ही पोलीस करतायत तरी काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
दौंड शहरातील पोलीस ठाण्या समोरील परिसर, महात्मा गांधी चौक, शालिमार चौक, सहकार चौक, गोपाळवाडी रस्ता, कुरुकुंभ मोरीचा परिसर, या परिसरात अवैध रित्या मटका, तसेच ऑनलाईन चक्री सर्हासपणे सुरू आहे. मात्र या ठिकाणच्या धंद्यावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री पत्त्यांचे क्लब, वेश्या व्यवसाय, या मुळे सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
चोरी, खून, दहशत माजवणे अशा घटनांमध्ये वाढ..:
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत सोनसाखळी चोरी, व्यावसायिकांना लूटणे, मारहाण करून दहशत निर्माण करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याबाबत मात्र पोलीस कठोर कारवाई करताना दिसत नाहीत.
पोलिसांचे हित संबंध..
दौंड पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचे हित संबंध असल्याने कारवाई होताना दिसत नसल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या परिसरात काही ठराविक मंडळी ही पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्या व्यक्ती मध्यस्ती करण्याचे काम करताना सर्हासपणे दिसून येत आहे.