जळगाव : अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणार असाल तर सावधान, तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकतो? अल्पवयीन मुलांनी लावलेल्या कारच्या शर्यतीत कारने सायकलवरील ११ वर्षाच्या मुलाचा जोरदार धडक देऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात रविवारी (ता.२८)संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.
विक्रांत संतोष मिश्रा असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर गाडी मालकावरही गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण तलाव परिसरात असलेल्या ट्रॅकवर दोन कारमध्ये शर्यत लागली होती. शर्यतीदरम्यान भरधाव वेगात असलेल्या एका इनोव्हा कारने दुसऱ्या कारला ओव्हर टेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी सायकलवर खेळत असलेल्या विक्रांत मिश्रा अचानक पुढे आला. कारने विक्रांत मिश्राला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता कि, यावेळी विक्रांत सायकलीसह दहा फूट उंच फेकला गेला आणि रस्त्यावर आदळला. या अपघातात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गाडीतील तिन्ही अल्पवयीन मुलांनी विकांतला तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो मृत्यू झाला होता.
दरम्यान, विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. विक्रांत हा मिश्रा परिवारातील एकुलता एक मुलगा गेल्याने मिश्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.