दीपक खिलारे
इंदापूर : पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने घरात पत्र्याच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बावडा (ता. इंदापूर) शनिवारी (ता.२१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जावेद जिलानी मुलाणी (वय-३२, रा. बावडा, ता. इंदापूर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तर जावेदची पत्नी व त्याचा मित्र प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत (स. बावडा, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जावेदचा भाऊ मुस्तफा जिलानी मुलाणी याने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुलाणी व आरोपी प्रवीण उर्फ बाबा सावंत हे दोघे एकमेकांचे लहानपणीचे मित्र होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी नेहमी येणेजाणे असायचे. जावेदचा सन २०१७ मध्ये विवाह झाला. दोघांमध्ये पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार चालत असत. नेहमीचे येणे व पैशांचे व्यवहार यातून जावेदची पत्नी व प्रवीण यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले.
यावरून जावेद व त्याच्या पत्नीबरोबर भांडण होत असे. त्या भांडणामुळे व अनैतिक संबंधामुळे जावेद नेहमी तणावात राहू लागला. व्यसन करू लागला. या कारणावरून प्रवीण व जावेदची पत्नी जावेदला वेळोवेळी मारहाण करत होते. या संदर्भात फिर्यादीने प्रवीण व जावेदच्या पत्नीला समजावून सांगितले होते. मात्र काहीच बदल झाला नाही. जावेदला ते दोघे त्रास देतच राहिले.
मागील दोन दिवसांपासून जावेद घरी न येता मुलाणी वस्ती जवळच्या ओढ्यावर अंघोळ करून तेथेच झोपत होता. शुक्रवारी (ता.२०) रात्री तो आपल्या घरी आला, त्यावेळी प्रवीणला घरात पाहून त्याने घरी का आलास अशी विचारणा केली. त्यावरून प्रवीणने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारतो असे म्हणत तो जावेदच्या अंगावर चालून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणने जावेदच्या घरी येऊन जावेदला दमदाटी केली व जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, त्यामुळे जावेदने आत्महत्या केली. अशी फिर्याद जावेदचा भाऊ मुस्तफा यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,गुन्हा दाखल होताच पोलिसांनी जावेदची पत्नी व त्याचा मित्र प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत याला अटक केली आहे. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत.