लोणी काळभोर : नांदण्यास नकार दिल्याने पत्नी व सासूवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता. हवेली) परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. चेतन जंगले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सोनाली चेतन जंगले (वय २७, रा. फुरसुंगी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि त्याची पत्नी सोनाली यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होते. वादामुळे सोनाली माहेरी निघून आली होती. त्यामुळे चेतन पत्नीवर चिडला होता. चेतन मध्यरात्री बाराच्या सुमारास पत्नीच्या आणण्यासाठी माहेरी गेला. चेतनने सोनालीला घरी चल, असे सांगितले. त्यावेळी सोनाली नकार दिला. त्यानंतर चेतनने कुऱ्हाडीने सोनालीवर वार केले. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासू संतोषी यांच्यावर चेतनने कुऱ्हाडीने वार केले.
दरम्यान, याप्रकरणी सोनाली जंगले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.