पुणे – नासाला १०० कोटींना आर. पी. धातूचे मौल्यवान भांडे विकून मोठी रक्कम मिळवून देऊ, असे आमिष दाखवून एकाला ४९ लाखाचा गंडा घालणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
रॉबर्ट रोझीरिओ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्याच्या सुस परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला तीन महिला आणि तीन पुरुषांच्या टोळीने काही महिन्यांपूर्वी ४९ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट रोझीरिओ हे रेल्वे पोलीस दलातील निलंबित अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी आर. पी. हे किरणोत्सारी पदार्थ वित्सर्जित करणारे भांडे असून ते नासाला विकायचे असल्याचे सांगितले होते. भाभा अटॉमीक सेंटर आणि आर बी आय यांच्यात करार झाल्याच सर्टिफिकेटही आरोपींनी फिर्यादींना दाखवले होते. त्यामध्ये भांड्याची किंमत १०० कोटी दाखवण्यात आली होती.
तसेच, फिर्यादींना शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम मिळवून देतो असे सांगत शेती कमी भावावमध्ये विकण्यास भाग पाडले.
त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आरटीजीएसद्वारे 37 लाख रुपये आणि 12 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. एकूण 49 लाख रुपये आरोपींनी लुबाडले. मात्र आश्नासनानुसार त्यांनी एकही रूपया परत केला नाही. या घटनेबद्दल हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.
दरम्यान, याआगोदारच हिंजवडी पोलिसांनी सोनाली जाधव, पूजा गरुड, संगीता नगरकर, मेहुल गांधी, सतीश मुकेकर यांना अटक केली. मात्र पोलिसांना यामागच्या खऱ्या सुत्रधाराला पकडणे अवघड जात होते. कारण रॉबर्ट रोझीरिओ हा सतत मोबाईल बदलत होता. सतत राहण्याचे ठिकाणही बदलत होता. मात्र आता पोलिसांना रॉबर्टला पकडण्यात यश आले आहे. हिंजवडी पोलिसांनी रॉबर्टला अटक केली आहे, आणि त्यांनी किती लोकांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहेत.