पुणे : पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी बनून आलेल्या चोरट्यांनी लग्नसमारंभातील पाहुण्यांच्या तब्बल ६५ तोळे सोन्याचे दागिने व ९ लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ४ चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीतील २६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
रितीक महेश सिसोदिया (वय-२०), वरुण राजकुमार सिसोदिया (वय-२३), शालु रगडो धपानी (वय-२८),शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय-३८, सर्व राहणार मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्किड हॉटेलमध्ये ६ डिसेंबर २०२२ रोजी लग्नसोहळा पार पडला. लग्न सोहळ्यात उत्साहाचे वातावरण होते. मात्र सोने आणि पैसे सापडत नसल्याने कुटुंबियांना घाम फुटला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जास्त असल्याने काही मिनिटात त्या समारंभात गोंधळ उडाला.
वऱ्हाड्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली होती. मात्र सोने आणि पैसे सापडत नव्हते. या सोहळ्यात चोरट्यांनी तब्बल ६५ तोळे सोने आणि ९ लाख रुपये रोख यांच्यावर हात साफ केला होता. शेवटी कुटुंबियांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहिले की दोन अनोळखी इसम हे फिर्यादीच्या आईची पर्स जाताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास चालू केला असता आरोपी हे मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील कडियासांसी या गावाचे असल्याचे समजले.
त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशमध्ये रवाना झाले. कडियासांसी गावात पोहोचले. तेव्हा त्या गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी गोळीबार देखील केला होता. या सगळ्या प्रसंगाला सामोर जात पोलिसांनी शिताफीने चौकशी केली. चोरांचा शोध घेतला.
यावेळी मध्य प्रदेशच्या स्थानिक पोलिसांचीही मदत झाली. पथकाने १७ दिवस वास्तव्य करून आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.