पुणे : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत हायवा टिपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा चोरीचा हायवा टिपर हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी रात्री ८ ते २३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान मौजे मुढाळे (ता. बारामती) येथील माळशिखरे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम पंपावरून अज्ञात चोरट्यांनी हायवा टिपर चोरी केला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२६ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तातडीने विशेष पथक तयार केले. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीचे बारकाईने विश्लेषण करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान चोरीचा हायवा टिपर वाळूज एमआयडीसी (संभाजीनगर) परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून राहुल विठ्ठल कराळे (वय ३१) आणि आदित्य रमेश कराळे (वय २५, दोघे रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर ८ लाख रुपये किमतीचा हायवा टिपर जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भागवत पाटील करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, तसेच भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, धनंजय भोसले आणि विकास येटाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.







