थेऊर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महातारी आई मंदिराच्या बाजूला एक अपघात झाला. यामध्ये अख्तर सय्यद या तरूणाचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. आता या अपघातप्रकरणी थेऊर येथील एका तरुणावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सागर महादेव धारवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अख्तर सय्यद याचे वडील बिबन सय्यद (वय ५२, रा, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर सय्यद (वय २३) या तरुणाचा शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला होता. हा अपघात थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महातारी आई मंदिराच्या बाजूला असलेल्या भिल्ल वस्ती परिसरात झाला होता.
सागर धारवाड याने भरधाव वेगाने कार चालवली. तेव्हा सागरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडास तिची धडक बसून गाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात फिर्यादी यांचा मुलगा अख्तर सय्यद याच्या डोक्यास, हातापायास किरकोळ व गंभीर जखमा झाल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी बिबन सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर धारवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करत आहेत.