मुंबई : येथील विमानतळावर ४० कोटी बाजारमूल्य असणारे ८ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात झिम्बावेच्या दोन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रोनाल्ड माकुंबे (वय ५६) व पत्नी माकुंबे लाव्हनेस (वय ५२) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई विमानतळावर आदीस अबबा येथून आलेल्या दोन नागरिकांना वेगळे करण्यात आले. आदीस अबबा हे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठे ‘हब’ असल्याचे मानले जाते. या दाम्पत्य तेथूनच आल्याने त्यांच्याकडे काही संशयास्पद गोष्टी आहेत का, याची चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये विसंगती आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही दाम्पत्याच्या सामानाची कसून पडताळणी केली असता, त्यांच्या सामानात तापकिरी रंगाची पावडर आढळून आली. या पावडरची रासायनिक तपासणी केल्यानंतर यात अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दांपत्याने आपण येताना केपटाऊन येथून अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली.
हे अमली पदार्थ भारतात आणण्यासाठी शेरॉन नावाच्या महिलेने त्यांना सांगितले होते. तसेच या महिलेने दोघांच्या विमानाच्या तिकिटांसह हे अमली पदार्थ दिले होते. तसेच या दोघांना ५०० अमेरिकन डॉलर्सचे देखील आमिष दाखविण्यात आले असल्याचे दाम्पत्याने सांगितले.