पुणे : स्त्रीधन आणि पोटगीमार्फत मुलीला मिळालेल्या तब्बल ३५ लाख रुपयांवर वडील आणि भावानेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी येथील आळंदी रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामलाल घाशीराम कोठारी आणि अरविंद रामलाल कोठारी (रा. आळंदी रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बापलेकांची नावे आहेत.
याप्रकरणी चिपळूण येथील एका ४० वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर प्रकार हा २०१६ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे रामलाल हे वडील तर अरविंद हा भाऊ आहे. फिर्यादी यांचे पहिल्या पतीकडून त्यांना २४ लाख रुपयांचे ४२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून परत मिळाले होते. तसेच पोटगी म्हणून ९ लाख रुपयांचा डी डी मिळाला होता.
दरम्यान, फिर्यादी यांनी तो डी डी भावाच्या खात्यात जमा केला होता. हे मिळालेले सर्व पैसे व दागिने परत करण्याची फिर्यादी यांनी वडिल व भावाकडे वारंवार मागणी केली.मात्र त्यांनी ती परत न करता शिवीगाळ करुन तिला धमकी दिली आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.