पुणे : खेडशिवापूर (ता. हवेली) येथील एका इसमाला पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी गावडदरा परिसरातून ताब्यात घेतले आहे.
विठ्ठल शिंदे (वय – २६ व एकनाथ शिंदे वय – ३० रा. दोघेही गावडदरा ता. हवेली जिल्हा पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडशिवापूर (ता. हवेली) येथील एका इसमाला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विठ्ठल शिंदे व एकनाथ शिंदे यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी शिंदे हे फरारी होते.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व त्यांचे पथक खेडशिवापूर परिसरामध्ये गस्त घालीत असताना पथकातील विशाल भोरडे व मोसिन शेख यांना आरोपी गावडदरा परिसरामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विठ्ठल शिंदे व एकनाथ शिंदे या दोघांनाहि ताब्यात घेण्यात आले व पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार विशाल भोरडे व मोसिन शेख यांच्या पथकाने केली आहे.