चाकण : मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून वयोवृध्द नागरीकांची लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकाश फड (रा. दरेवाडी ता. संगमनेर, जि. अहमदनगर), वैभव दिगंबर नागरे (वय -२०), अतिष बाळासाहेब बडवे ( वय-२३, रा. दोघेही पिंपरी लौकी ता. संगमनेर जि. अहमदनगर), नंदकुमार पवार (वय -२१, रा. दरेवाडी ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थोरांदळे येथील एका वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याबाबत चिकणाबाई मिंडे (वय ७२, रा. थोरांदळे, ता. खेड) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना गुरुवारी (ता. १६) धामणी गावात रात्री अकराच्या सुमारास गोविंद भगवंत जाधव (वय ८२ वर्ष) यांच्या घरात अनोळखी माणसांनी घुसून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याची तक्रार पारगाव पोलीस ठाण्यात दिली होती.
अशाप्रकारे एका मागून एक झालेल्या दोन गंभीर प्रकार घडल्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हा लवकरात लवकर उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदर गुन्हयामध्ये दरेवाडी ता. संगमनेर येथील आकाश पांडुरंग फड नावाचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मिळलेल्या माहितीच्या अनुशंघाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश फड याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे वरील साथीदार यांच्या समवेत केल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मंचर व पारगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, पोलीस नाईक संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू विरकर यांचे पथकाने केली आहे.