हडपसर : मांजरी (बु) ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करून दुचाकीवरून पळून गेलेल्या मुख्य तीन आरोपींना हडपसर पोलिसांनी भिवंडी (ठाणे), व अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींची संख्या हि १० वर पोहोचली आहे.
समिर लियाकत पठाण (वय – २६), शोएब लियाकत पठाण (वय – २२ रा. दोघेही रा. गोपाळपट्टी, मांजरी, ता. हवेली), गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार (वय – २२, रा. महादेवनगर, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ०९) मांजरी (बु) ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीत अनोळखी गुंडानी मंडळी जमवुन किरकोळ कारणावरून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले होते. व दुचाकीवर जाताना गाडीला लावलेली कोयते हवेत फिरवत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी ७ आरोपींना ताब्यात घेतले होते.
मात्र, गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य सराईत आरोपी समीर पठाण, शोयब पठाण, व गणेश हवालदार हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. आरोपी हे भोर, सांगली, कोल्हापूर, बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असलेबाबत तांत्रिक माहीती प्राप्त होत होती. तसेच आपले राहण्याचे ठिकाण हे बदलत होते.
दरम्यान, हडपसर पोलीस तपास करीत असताना आरोपी गणेश हवालदार हा कामठघर, (ता. भिवंडी जि. ठाणे) येथे असल्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाली. तपास पथकाचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांची तपास पथकाचे कर्मचारी ठाणे या ठिकाणी जाऊन आरोपी गणेश हवालदार यास ताब्यात घेतले.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर यांच्या तपास टिमने दातरंगे मळा, नालेगाव (जि. अहमदनगर) या ठिकाणी कारवाई करून समिर पठाण व शोएब पठाण या दोघांना ताब्यात घेतले. या तिन्ही आरोपींची मागील ७ वर्षापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हडपसर पोलीसांनी या गुन्ह्यात १० आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्ग्दर्शानाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, यांचे पथकाने केली आहे.