हडपसर : फुरसुंगी येथील दारूच्या गोडावूनची भिंत फोडून जबरी चोरी करणाऱ्या ३ आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दारूचे बॉक्स, ट्रक, पिकअप असा ४९ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर (वय २६ वर्ष रा. मु.पो. उकडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सागर ऊर्फ दाचा शिवाजी मस्तुद (वय २८ वर्ष रा. मु.पो. पांगरी ता. बार्शी जि.सोलापूर) आणि तानाजी भागवत चौघुले (वय-३८, रा. मु.पो. पारडी ता. बार्शी जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गोडाऊनचे व्यवस्थापक संतोष लघु केशने (गाईन एन्टरप्रायझेज प्रा लि. श्रीनाथ वेअर हाऊसिंग पुणे सासवड रोड पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष केशने हे वाईन एन्टरप्रायझेज प्रा. लि.श्रीनाथ बेअर हाऊसिंग पुणे येथे व्यवस्थापक आहे. केशने यांनी पुणे- सासवड रस्त्यावरील फुरसुंगी येथील गोडावून मध्ये दिवस भरात येणाऱ्या दारूचे बॉक्सचा माल शनिवारी (ता.६ ऑगस्ट) उतरवुन घेतला. आणि गोडाऊन संध्याकाळी बंद केले. रविवारी सुट्टी असल्याने गोडाऊन बंद होते.
केशने हे नेहमीप्रमाणे सोमवारी (ता.८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोडावून उघडण्यासाठी गेले होते. केशने यांनी गोडाऊन उघडून पाहिले असता, गोडाऊनमध्ये माल अस्थाव्यस्त पडलेला दिसून आला. गोडावून मध्ये चोरी झाली असल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी गोडावूनमधील सीसीटीव्हीचा डिव्हीआर हा काढून नेला होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. दुकानामधिल रॉयल स्टैग, इम्पेरीयल ब्ल्यू, ब्लेन्डर या कंपन्याचे दासचे ३०२ बॉक्स किं. २५ लाख ४३ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या.याप्रकरणी संतोष केशने यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पथक प्रमुख विजयकुमार शिंदे यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्यातील आरोपींनी दारूचे गोडावून मध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरून नेल्याने आरोपी बाबत काही एक माहीती उपलब्ध नव्हती. गुन्हा शनिवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान झालेला असल्याने गुन्ह्याची निश्चित वेळ कोणती याचाही अंदाज येत नव्हता. त्यामुळे सुरवातीस चारचाकी वाहनाचा वापर झाला असेल व रात्रीच्या वेळीच हा गुन्हा केला असावा. या दोन गोष्टी आधारभूत धरून त्याआधारे तपास करण्याचे नियोजन केले.
दरम्यान, तपास पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी केली, गोडावून चे पाठीमागील बाजुने भिंत फोडून आत प्रवेश केला असल्याने तसेच मागिल भिंतीपासून काही फुट अंतरावर पॉवर हाऊस फुरसुंगी गावाकडे जाणारा असा दुतर्फा रोड आहे. त्या रोडला लागुन असलेली भिंत देखील थोडयाफार प्रमाणात फोडली असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी गोडावून मधिल काही दारूचे बॉक्स फोडुन दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. यावरून गुन्ह्याची पध्दत लक्षात आली की, आरोपींनी पाठीमागील बाजूने आत प्रवेश केला.
हडपसर पोलिसांनी परिसरातील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. परंतु सुरवातीस त्यामध्ये यश आले नाही. परंतु त्यानंतर घटनास्थळी आलेले वाहन किमान ३० मिनीट एकाच जागेवर थांबले असेल व नंतर ते पुढे गेले असेल ही शक्यता गृहीत धरली व पुन्हा घटनास्थळाच्या बाजुस असलेल्या चारही दिशांचे फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये संशयीत हालचाल तपास पथकास मिळून आली. या माहीतीचा धागा पकडून पुढे, फुरसुंगी गावठाण, लोणीकाळभोर टोल नाका ते पाटस टोल नाका परिसरातील २०० पेक्षा जस्त सीसीटीव्ही फुटेज पाहणी केले. मग पुढे सासवड रोड ते सोलापूर हायवे इतपर्यंतच्या भागातील फुटेज पाहणी करत आरोपींचा सुगावा तपास पथकाला मिळून आला
हडपसर पोलीस ठाण्यातील एक पथक तपासकामी उस्मानाबाद जिल्ह्याकडे रवाना झाले. पथकाने उस्मानाबाद भागातील कळंब, कन्हेरगाव, पांगरी, तेरखेडा, देवधानोरा, पारडी, तेरखेडा, पारधीफाटा या भागात गावातील परिसराची रेकी करून आरोपींबाबत माहीती घेतली असता, सदरचा गुन्हा हा विभीषण काळे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, आरोपींनी सदर गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींनी कन्हेरवाडी आणि आंदोरा या दोन्ही गावांच्या शिव रस्त्यामध्ये असलेल्या ऊसाच्या शेतात चोरी करून नेलेले दारूचे बॉक्स हे लपवून ठेवले होते. ते त्यांचेकडून जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून आतापर्यंत दारूचे बॉक्स, ट्रक, पिकअप सह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी विभीषण काळे हा उस्मानाबाद येथील पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खुन, सरकारी नोकरावर हल्ला असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत आरोपी यांचा शोध चालू असून त्यांचेकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
हि कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हब, अनिरूध्द सोनवणे आणि अतुल पंचरकर यांच्या पथकाने केली आहे.