हडपसर, (पुणे) : मानेवर तलवार ठेवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत एका मुलाला मारहाण करून टोळक्याकडून परिसरातील घरांवर, गाड्यांवर दगडफेक केल्याची घटना फुरसुंगी येथे घडली आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री एक वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील ढेरे कंपनीजवळ हि घटना घडली आहे.
रिषभ हिवाळे (रा. ड्रीम्स आकृती समोर, काळेपडळ), रोहन कुदळे (रा. शिवतेज नगर, काळेपडळ), अस्लम शेख (रा. वैष्णवी सिटी, आदर्शनागर), विक्र जगदने, अक्षय कोळी (रा. काळेपडळ), पवन भारती (रा. तरवडे वस्ती) व इतर दोन अनोळखी अशा ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर गुंडीबा कांबळे (वय- ४३ रा. संकेत विहार, फुरसूंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१८) फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कांबळे हे संकेत विहार परिसरात राहायला आहेत. रिषभ हिवाळे व त्याच्या साथीदारांनी फुरसुंगी येथील ढेरे कंपनीजवळ बेकायदेशीर जमाव जमवला.
आरोपी रिषभ हिवाळे याने त्याच्या हातातील तलवार ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मानेवर ठेवून तुम्हला सोडणार नाही तसेच घरच्यांनाही सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, टोळक्यामधील एकाने कांबळे यांच्या मुलावर लोखंडी कोयता उगारला. तसचे एका मुलाला बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी दिली आहे.