हडपसर : पत्नीचा गळा दाबून खून करून पतीनेही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज येथे घडला आहे. बुधवारी (ता. १५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
स्वाती अक्षय जाधव (वय – २२, रा. साई पॅराडाईज सोसायटी, फुरसुंगी गाव) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, अक्षय आनंदा जाधव (वय २५) असे खून करणाऱ्या पतीचे नाव असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी स्वाती हिचे वडिल विनायक मारुती थोरात (वय ३९, रा. साईनगर, अहमदनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय व स्वाती यांचा ४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अक्षय याचा भाड्याने गाड्या देण्याचा व्यवसाय आहे. दोघामध्ये झालेल्या वादातून अक्षय याने स्वातीचा गळा दाबून व डोके आपटून खून केला. त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी जाधव हे घर उघडत नाही हे समजल्यावर पोलिसांना कळविण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता अक्षय हा अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक डमरे अधिक तपास करीत आहेत.