हडपसर : आजारी मांजरीवर पशु दवाखान्यात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने मांजर प्रेमीने रागाच्या भरात पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण करून दवाखान्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडला आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ बापू ढगे (वय ५१ वर्ष, रा. शांतिनिकेतन सोसायटी, मगरपट्टा रोड हडपसर) असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी ढगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात मांजर प्रेमी महिलेसह चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर मंत्री मार्केट येथे पशू वैद्य डॉ. रामनाथ ढगे यांचा दवाखाना आहे. रविवारी एक महिला आणि चार अनोळखी जण मांजरावर उपचार करण्याकरिता दवाखान्यामध्ये घेऊन आले. चार-पाच दिवसापासून मांजर काही खात नाही, त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. असे महिलेने सांगितले होते. मांजराची तपासणी करत असताना काही उपचार करण्याअगोदर ते मांजर मयत झाले.
आजारी मांजरीवर पशु दवाखान्यात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. आवडत्या मांजराचा मृत्यू झाल्याचे समजतात मांजरप्रेमी महिला व तिच्या पतीने तीन मुलांना बोलावून घेतले आणि शिवीगाळ करत “मांजर कसे झोपले, आता तुलाही असाच झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो” अशी धमकी दिली. त्यानंतर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, यामध्ये डॉक्टरच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर केले.
दरम्यान, आरोपींनी दवाखान्यामधील वस्तूंची तोडफोड केली. अशी फिर्याद डॉक्टरांनी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्याने महिला व चार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.