अमरावती: एका वकिलाने बिझीलँड मार्केटमधील एका दुकानातून कोट शिवण्यासाठी कापड खरेदी केली आणि त्याच्याकडेच कोट शिवाय लटकला. पण वेळेत कोट मिळाला नसल्याने वकील ग्राहकाने थेट जिल्हा ग्राहक मंचातच या दुकानदाराची तक्रार केली. ग्राहक मंचाने देखील वकिलाच्या बाजूने निर्यय देताना दुकानदाराला २५ हजारांचा दंड ठोठावला. यामुळे जिल्ह्यात साध्याच याच केसची चर्चा रंगली आहे.
नक्की प्रकरण काय ?
अमरावतीच्या परतवाडा येथील रहिवासी असलेले अॅड तरुण शेंडे यांनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोटची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी २६ ऑक्टोबर २०१९ साली येथीलच बिझीलॅन्ड येथील ब्लेझर्स स्टुडिओचे संचालक अमर मानकचंद लुल्ला व ब्लेझर्स स्टुडिओचे व्यवस्थापक सुधीर दुधलानी यांच्या दुकानातून कापडाची खरेदी केली. यावेळी स्टुडिओचे संचालक व व्यवस्थापक यांच्या सूचनेनुसार शेंडे यांनी कोट शिवण्यासाठी दिला. कार्यक्रमापूर्वी कोट शिवून देण्याचे दोघांमध्ये ठरले होते.
मात्र, स्टुडिओचे संचालक व व्यवस्थापक यांनी दिलेल्या मुदतीत ग्राहक वकिलाला कोट शिवून दिला नाही. यासंदर्भात वकिल ग्राहकाने दुकानदाराकडे पाठपुरावा केला, मात्र या दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. शेवटी ०२ डिसेंबर २०१९ रोजी संपर्क केल्यानंतर दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली.
वकील थेट ग्राहक मंचात दाखल…
उडवाउडवीच्या उत्तरांनी वैतागलेल्या वकील ग्राहकाने थेट ग्राहक मंचात दुकानदाराची तक्रार दाखल करताना सदोष सेवेचा व्यवहार केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार स्टुदिओचे संचालक व व्यवस्थापन यांना दोषी ठरविण्यात आले व त्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच ३० दिवसात या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी तक्रारदार अॅड. तरुण शेंडे यांच्यावतीने अॅड. भरत शेंडे यांनी यशस्वी युक्तिवाद केला