मुंबई : गुजरात मधील नवसारी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बस व चारचाकी फॉर्च्यूनर गाडी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात ९ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. ही बस राष्ट्रीय महामार्गावर नवसारी जिल्ह्यातील वेसवान गावाजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, फॉर्च्यूनर कार चक्काचूर झाली असून बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले.
पोलिसांनी घटनास्थळाहून एकमेकांत अडकलेली वाहने बाजुला केली आहेत. तसेच जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मोठमोठ्याने किंचाळणे आणि आरडाओरडा सुरु झाल्याने गावातील लोक जागे झाले आणि घटनास्थळी धावले.
यानंतर पोलिसांनाही बोलविण्यात आले व बचावकार्य सुरु होते. फॉर्च्यूनरमध्ये अडकलेल्या व बसमधील जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ९ जणांना मृत घोषित केले. सर्व मृत कारमधील होते. फॉर्च्यूनर कार डिव्हाडर ओलांडून पलिकडच्या साईडला आली होती. यामुळे समोरून येणाऱ्या बसवर आदळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या अपघातात ३२ जण जखमीही झाले आहेत. ३२ जखमींपैकी १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वलसाडला रेफर केले. एका जखमीला सुरतला पाठविण्यात आले आहे. अन्य १४ जखमींवर नवसारी येथेच उपचार सुरू आहेत.