पुणे : लोहगावमधील संतनगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी नराधम पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्वप्नील बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष सफाई कामगार आहे. लोहगाव येथील संतनगर परिसरात तो पत्नीसह भाड्याने खोली घेऊन राहत होता. काही महिन्यांपासून आशिष पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता. या संशयातून अनेकदा दोघांमध्ये खटके उडत होते. याच वादातून त्याने स्वयंपाकघरातील सुरीने पत्नी रुपालीवर वार केले.
दरम्यान, रुपालीच्या आवाजामुळे या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. शेजाऱ्यांनी तातडीने ही माहिती पोलीस ठाण्यात दिली आणि जखम रुपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी आशिषला पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय धामणे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.