पुणे: मुंढवा परिसरात मागील पंधरा दिवसापूर्वी मालमत्तेच्या हव्यासापोटी नातवाने आजीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच, वारजे येथे २४ वर्षीय नातीने ऑनलाईन ॲपचे कर्ज फेडण्यासाठी आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नातीने आजीचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील सोने विकून कर्ज फेडले. त्यानंतर चोरट्यांनी आजीचा खून करून दागिन्यांची चोरी झाल्याचा बनाव रचला. मात्र, वारजे माळवाडी पोलिसांनी सदर खुनाचा गुंता उलघडून नातीला बेड्या ठोकल्या आहेत.
गौरी सुनिल डांगे (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या नातीचे नाव आहे. तर सुलोचना सुभाष डांगे (वय-७२) असे खून झालेल्या ज्येष्ठ आजीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजी सुलोचना, मुलगा सुनिल आणि नात गौरी असे तिघेजन वारजे माळवाडी येथील सुगम विश्व कॉलनीत राहण्यास आहेत. सुनिल हे कार पेटिंगचे कामे करत होते. तर नात गौरी खासगी नोकरी करत होती.
दरम्यान, आरोपी गौरीने ऑनलाईनच्या माध्यमातून लोन ॲपमधून १५ हजार रुपयांचे लोन घेतले होते. आरोपीने लोन फेडले नव्हते. त्यामुळे तिला कंपनीचे वारंवार फोन येत होते. त्यामुळे गौरीने मंगळवारी वडिल बाहेर गेल्यानंतर आजीचाधारदार शस्त्राने वार करून खून केला. व तिच्या अंगावरील दागिने चोरले. त्यानंतर बाहेर जाऊन दागिने विकले. आणि मिळालेल्या पैशांमधून लोनची रक्कम जमा केली. त्यानंतर पुन्हा घरी येऊन आजीचा खून झाल्याचा व घरातील दागिने चोरीस गेल्याचा बनाव रचला.
या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सदर खून हा नातीचे लोन ॲपचे कर्ज फेडण्यासाठी केला आहे. असे तपासात निष्पन झाले आहे. पोलिसांनी आरोपी नात गौरी डांगेला ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत.