लहू चव्हाण
पांचगणी, (सातारा) : मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन नातीनेच आपल्याच घरातील आजीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना पांचगणी पोलिसांनी तपासादरम्यान उघडकीस आणली आहे. पोलिसांच्या या तपास कौशल्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून सुनंदा तुकाराम बनसोडे (वय- ३८ रा. गोखलेनगर, जानवाडी, सोमेश्वर मंदिर, पूणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
पांचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०३) पांचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासवंड (ता. महाबळेश्वर) येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये राहणाऱ्या वयोवृध्द दांपत्य यांच्या राहत्या घराचे कुलुप चवीने उघडून अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेहाला होता. याबाबत आंनदा पवार यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना गोखलेनगर हडपसर पुणे येथे घरफोडी करुन चोरीस गेलेले दागिने विक्री केल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता फिर्यादी यांची विधीसंघर्षग्रस्त नात हिने चैनीचे वस्तु खरेदी करण्याकरीता पूणे येथून कासवंड येथे येवून चोरी केली.
यावेळी चोरीचे दागिने तिचा विधीसंघर्षग्रस्त मित्र व त्याची आई सुनंदा बनसोडे हिचे ओळखीने व मदतीने गोखलेनगर येथील एका सोनारास विकून त्यातुन आलेल्या पैशातून महागडे कंपनीचा मोबाईल व एक स्कुटी मोटारसायकल बुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ८६ हजार रुपयांचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे-वरूडे, पोलिस अंमलदार रविंद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे पाचगणी पोलिस ठाणे यांनी केली.