मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार यांच्याबाबत सुगावा एफबीआयला (फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन) लागल्याची माहिती मिळत असून गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅक करण्यात आले आहे. लवकरच त्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोपविण्यात येणार असल्याचे समजत आहे.
त्यामुळे एफबीआय लवकरच गोल्डी ब्रारला अटक करण्याची शक्यता बळावली आहे. गोल्डी ब्रारने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सक्रिय सदस्य असून अनेक वर्षांपासून कॅनडामधून आपला गुन्हेगारी व्यवसाय सांभाळत आहे. परदेशातूनच त्याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचे कळत असून त्यांनी हा कट आपल्याच गुंडांकडून करून घेतल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सध्या तो कॅनडातून अमेरिकेत पळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला यांच्या संदर्भात व्हिडीओ प्रसिद्ध करताना त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गोल्डी ब्रारने घेतलेल्या जबाबदारीने पंजाब पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली आहे.