नसरापूर : वरवे (ता. भोर) येथील लघु पाटबंधारे तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेला तलाठी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (ता.२५) दुपारी उघडकीस आली आहे.
मुकुंद त्रिंबक चिरके (वय-३५ रा. नसरापूर, ता. भोर, मुळगाव माजलगाव जि. बीड) असे बुडून मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद चिरके हे सहा महिन्यांपूर्वी तलाठी म्हणून वेल्हा येथे कार्यरत होते. त्यांची नुकतीच बदली भोर येथे झाली होती. चिरके हे त्यांच्या मित्रांसोबत रोज वरवे येथील लघु पाटबंधारे तलावात पोहायला जात होते. आज सोमवारी (ता.२५) सकाळी सात वाजता दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा चिरके मित्रांना म्हणाले कि, मी पोहत जाऊन पलीकडच्या किनाऱ्यावर जावून येतो. असे म्हणून पाण्यात पोहत गेले.
त्यानंतर चिरके हे पाण्यात मध्यभागी गेल्यावर त्यांची दमछाक झाली. त्यांनी हात वर करुन आपल्या मित्रांना मदतीसाठी आवाज दिला. मित्रांनी तातडीने किनाऱ्यावरील साधी वल्हवण्याची बोट घेऊन तिथे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, चिरके यांचे मित्र तेथे पोहोचण्यापूर्वीच चिरके पाण्यात बुडाले. स्थानिक तरूणांनी देखील त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु. पाणी खोल असल्याने यश येऊ शकले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचM भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली,विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप व महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथकाला बोलाविण्यात आले आहे. पथकाच्या वतीने चिरके यांचा मृतदेह पाण्यात शोधण्याचे कार्य सुरू आहे. आणि दुपारी एक वाजे पर्यंत चिरके यांचा मृतदेह आढळून आलेला नाही.