दौंड : मोठ्या भावाने दुसऱ्या समाजातील मुलगी पळवून नेल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी लहान भावाला व आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात २२ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान बेलुसे, बाबु बेलुसे, समीर हरपुडे, बाळा हाळंदे, श्रीकांत पोळेकर, समीर हारपुडे याची आई, बाबु बेलुसे याची आई व इतर १० ते १५ जण (सर्व रा. पाटस, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पाटस येथील मातंग समाजाचा मुलगा व मराठा समाजाची मुलगी प्रेमप्रकरणातून पळून गेले होते. त्यानंतर आरोपी समीर हरपुडे याने पिडीत महिलेच्या मोबाईलवर १६ फेब्रुवारीला फोन करून तुमच्या मुलाने बहिणीस पळून नेल्याचे सांगितले. यावर यावेळी पीडित महिलेने तुम्हाला योग्य वाटते ते करा असे सांगितले.
त्यानंतर आरोपी समीरच्या पत्नीनेही पिडीत महिलेला फोन करून म्हणाली. मावशी तुम्ही घरी या, मुले कुठे आहेत माहिती आहे का ? अशी माहिती विचारली. मात्र पिडीत महिलेने आपण आजारी असल्याचे सांगितले. आणि संबंधित पिडीत महिला ही शेतात काम करण्यास गेली.
या दरम्यान तुमच्या लहान मुलाला लोक मारहाण करत असल्याचे पीडित महिलेला तिच्या शेजारी राहात असलेल्या महिलेने सांगितले. हे ऐकून गडबडीत घरी आलेल्या महिलेने मुलाच्या ७ कुटुंबीयांनी व अनोळखी १०-१५ जणांनी मारहाण केली, असल्याची तक्रार महिलेने यवत पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात २२ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.