पुणे : बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करण्यात आली आहे.
सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे हा फरार झाला होता. यानंतर गौतम काकडे यांना अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी आंदोलन केलं. तसेच गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पोलिसांनी गौतम काकडे यांना अटक केली आहे. या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे.
नेमक प्रकरण काय?
काही दिवसापूर्वी सर्जा नावाचा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून रणजित निंबाळकर यांनी 61 लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी ५ लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये येणे बाकी होते.
व्यवहार झाल्यानंतर त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.