Pune Crime : पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला कोंढवा पोलिसांनी नुकतीच अटक केली. गुंडाकडून दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुळशीराम शहाजी उघडे (वय २५, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील खडी मशीन चौकात एकजण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल मेमाणे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तुळशीरामला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तूल सापडले. त्याच्याकडून पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करण्यात आली.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, जोतीबा पवार आदींनी ही कामगिरी केली.