पांचगणी : पांचगणी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी संस्थाचालक व शिक्षिकेच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पांचगणीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पांचगणी येथील स्कॉलर फाउंडेशन स्कूल शाळेच्या संस्थापिका सिलींन वायाफुली, शिक्षिका अनुप्रिता पुर्ण नाव माहीत नाही असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थाचालक व शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थांचे पालक सुनिल शंकर आंब्राळे (वय -२२ रा. खत्री व्हिला बंगला आंब्रळ ता. महाबळेश्वर) यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पांचगणी येथील स्कॉलर फाउंडेशन स्कूल या शाळेत मुलास युनिफॉर्म बाबत उलट बोलल्याचा राग मनात धरून त्या शाळेतील शिक्षिका अनुप्रिता व सिलींन वाय पुल्ली पुर्ण नाव माहित नाही यांनी मुलास वर्गाचे बाहेर उभे राहण्याची शिक्षा केली. तसेच त्याला अपमानीत करुन दोघींनी त्याचे कानशीलात हाताने मारहाण करुन दमदाटी केली. याबाबत संस्थाचालक व शिक्षिकेच्या विरोधात सुनील आंब्राळे यांनी पाचगणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ८२,७५प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना निलेश माने व त्यांचे सहकारी करीत आहेत.