बारामती : बारामतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मित्र-मैत्रिण बारामती विमानतळ परिसरात फिरण्यासाठी गेले असता तेथे आलेल्या दोघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने बळजबरीने लंपास केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या मित्राला बेदम मारहाण केली.
शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोजूबावी हद्दीत बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित २१ वर्षीय तरुणीने बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुणी बारामतीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी तरुणी मित्रासह बारामती विमानतळाच्या बाजूला फिरण्यासाठी गेली. तेथे गाडीत गप्पा मारत असताना ३० ते ३५ वयोगटातील तोंडाला मास्क लावलेले दोन व्यक्ती तेथे आले. त्यांनी तरुणीसह तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची साखळी आणि कानातील टॉप्स असे ९० हजारांचे दागिने काढून घेतले.
त्यानंतर तिच्या मित्राला दगडाने जबर मारहाण केली. दोघांनाही गाडीतून बाहेर काढून जवळच एक खड्डा असलेल्या ठिकाणी नेले. त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला सांगून त्यांचे त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले. तिच्याकडील फोनवरून कोणाला तरी फोन करीत, तुला फोटो पाठविले आहेत, बघून घे, असे म्हणत फोन कट केला. तसेच पोलिसांत गेला तर तुमचे काढलेले फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.