पुणे : एका सोसायटीत राहणार्या मैत्रिणीच्या घरी खेळायला गेलेल्या ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वारजे माळवाडी येथील एका सोसायटीत गुरुवारी (ता.२) रोजी रात्री आठ वाजता घडली आहे.
संग्रामसिंग पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ९ वर्षाची मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी तिला जिन्याजवळ नेऊन तिच्याशी अश्लिल चाळे केले. इतरांना सांगू नको, असे म्हणून धमकावले.
त्यानंतर त्याने आपल्या मुलीला कपडे बदलण्यास आत पाठवून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याने ती घाबरुन सोसायटीच्या गार्डनमध्ये पळून आली.
दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.