सुरेश घाडगे
परंडा : शहरातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन बँकेत बनावट सोने तारण करुन २ लाखा रुपये उचलून अपहार केल्याप्रकरणी मूल्याकंन करणारा सोनार व कर्जदार या दोघावर परंडा पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील लतीफ शेख यांनी सोन्याच्या ६ बांगड्या घेऊन त्यावर कर्ज घेण्यासाठी २७ जुलै २०२२ रोजी भाऊसाहेब बिराजदार अर्बन बँकेच्या परंडा शाखेत आले. बँकेच्या वतीने सोन्याचे मुल्यांकन करणारे सोनार अमोल शहाणे यांना बँकेत बोलविण्यात आले. अमोल शहाणे यांनी सोन्याचे बांगड्याचे वजन केले असता ७३ ग्रॅम भरले. बट्टा काढून ५८.५६० ग्रॅम वजन भरले. अमोल शहाणे यांनी बांगड्या हया सोन्याच्या असल्याचे सांगीतल्याने बँकेने लतीफ शेख यांना सोन्याच्या तारणावर दोन लाख कर्ज मंजूर केले व पत्नी त्याच्या कायदेशीर वारस असल्याचे लिहून दिले.
कर्ज फेडीची मुदत २७ जुलै २०२३ अशी नमूद करण्यात आली होती. सोबत घोषणापत्र व शंभर रूपयाचा बॉन्ड देण्यात आला. कर्ज घेतल्यापासून लतीफ शेख एकदाही कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेचे व्यवस्थापक भरत जाधव यांना संशय आल्याने बँकेचे कर्जदार लतीफ शेख यांना बोलावून घेवून मोबाईल मध्ये व्हिडीओग्राफी करून अमोल शहाणे याने सिलबंद करून ठेवलेले सोन्याच्या बांगड्या मुख्य शाखा उमरगा बँकेचे सोनार दिक्षीत यांनी या बांगड्या बेनटेक्सच्या (बनावट) असल्याचे सांगीतले.
याप्रकरणी शाखा व्यवस्थापक भरत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुल्याकंन करणारे अमोल शहाणे व कर्जदार लतीफ शेख या दोघावर परंडा पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस करत आहेत.