पुणे : फुरसुंगी येथे फ्रॉड केस समोर आली आहे. हिप्नोटाईज करुन 10 लाखांना गंडा घातला आहे. बँक खात्यामधून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची आहे. असे सांगून फुरसुंगी येथील एका व्यक्तीची 10 लाख 60 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 जून 2024 रोजी घडला आहे.
याबाबत आनंद दिनकर खेडेकर (वय-40 रा. बी-605, मॅजेस्टिक एक्वा, फुरसुंगी, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सायबर चोरट्यांवर आयपीसी 419, 420, आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी आनंद खेडेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. फोन करणाऱ्या व्यक्तीने फेडेक्स मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या बँक खात्यामधून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या बँक खाते पडताळणीच्या बहाण्याने फोनवरुन हिप्नोटाईज केले.
यानंतर फिर्यादी यांची कुठलीही परवानगी न घेता कागदपत्रांची पडताळणी न करता लोन मंजूर करुन घेतले. मंजूर झालेल्या लोनची रक्कम आणि बचत खात्यातील असे 10 लाख 60 हजार रुपये ट्रान्स्फर करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.