Fraud | नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारचा ऑगस्ट 2022मध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी मंत्रिपद मिळवून देतो असे सांगून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्विय सहाय्यक असल्याचे सांगत या व्यक्तीने ६ आमदारांची फसवणूक केली आहे.
भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 -9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा वातावरणात आता मंत्रिपदासाठी घोडेबाजार होत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
भापजच्या दोन ते तीन आमदारांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. नागपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील मोरबीमधून मंगळवारी (ता.१६ ) रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. नीरज सिंह राठोड असे आरोपीचे नाव आहे.
पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी…
गेल्या काही दिवसापासून नीरज सिंह राठोड हा फोनवरुन या आमदारांच्या संपर्कात होता. जे.पी नड्डा यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा त्याने केला होता. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असे त्याने सांगितले होते. पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या. असे या आमदारांना सांगण्यात आले.
नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. ज्यामध्ये निरज सिंह राठोड नामक व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत मोठ्या रक्कमेची मागणी केली होती.
विकास कुंभारे यांनी याबाबत माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जे.पी. नड्डा यांच्या जवळची नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!