पुणे – पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण गावखडी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे.आकाश पांडुरंग सुतार (वय. 28) असे समुद्रात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश सुतार, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र रविवारी सुट्टी असल्याने गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात आले.
दरम्यान, राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यांशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने पोलीस व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन आकाशचा शोध घेत आहे.