हडपसर : सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना तब्बल एक कोटीचा गंडा घातलेल्या चार आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून बेड्या ठोकल्या आहेत.
राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो व रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांच्या कंपनीतील संचालक सतीश देशपांडे यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत स्वत:ची ओळख आदर पूनावाला अशी दिली आणि सतीश देशपांडे यांची १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांना विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची आरोपींनी फसवणूक केली होती.
आरोपीने आदर पुनावाला यांचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या नंबरचा वापरला होता. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यापासून याचा तपास करून बंड गार्डन पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.