शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन व आयओका पेट्रोलीयम एच. पी. कंपनीच्या पेट्रोलपंपावर दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
करण युवराज पठारे (वय-२०, रा. गुजरमळा, शिरूर, मुळ रा. राय गव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर,) रोहन सोमनाथ कांबळे (वय-२०, रा. बो-हाडे मळा, शिरूर), अजय जगन्नाथ माळी (वय- २३, रा. माठ, नेहरवाडी, ता. श्रीगोंदा, जी. अहमदनगर), अजय सोमनाथ लकारे (वय-२१, रा. माठ, इंदीरानगर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन आरोपी साथीदार फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाषाणमळा, शिरूर येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड या पेट्रोलपंपावर शनिवारी (ता. १२) अज्ञात इसमांनी मोटारसायकलवर येऊन पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून ४९ हजार ४०० व एक मोबाईल फोन जबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच न्हावरा गावचे हद्दीतील आयओका पेट्रोलीयम या एच.पी. कंपनीच्या पेट्रोलपंपावर सहा इसमांनी तेथील कामगारांना कोयत्याने धाक दाखवून १ लाख ०२ हजार रुपयांची रोख रक्कम मोबाईल फोन व पाकीट असा दरोडा टाकून चोरून नेला होता. अशाप्रकारे चार दिवसांचे आत दोन गुन्हे घडले होते.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना दिले होते.
त्यानुसार स्वतः घटनास्थळावर भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद-पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार, राजु मोमीन, जनार्दन शेळके, गुरू जाधव, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, मुकुंद कदम यांची दोन पथके स्थापन करून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून वरील चार आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्हा करताना त्यांनी वापरलेले चार कोयते जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत आहेत.