पुणे : फक्त मौजमजा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने १० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांना ११ गुन्हे उकल करून ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
वारजे माळवाडी पोलीस बुधवारी (ता.१०) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना, कॅनाल रस्त्यावरील खानमज्जीद जवळ एका लाल रंगाच्या मोटारसायकलसह एक मुलगा संशयीतरीत्या थांबलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, मुलाजवळ असलेली दुचाकी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीची असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच मुलाने यापुर्वी आजुबाजुच्या परीसरातुन अजुन काही गाड्या चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली.
मौजमजा करण्यासाठी चोरल्या १० दुचाकी
दरम्यान, अल्पवयीन मुलाने सदरच्या गाड्या या फक्त मौजमजेसाठी चोरी केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मुलाने लपविलेल्या १० मोटार सायकल व ०१ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे. वारजे माळवाडी, हिंजवडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, पर्वती या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ११ वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांनी केली आहे.