पुणे : मांजरी खुर्द (ता.हवेली) येथील नकली पनीर बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी (ता.५) छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द (हवेली) येथील आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर नकली पनीर बनविण्यात येत आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने प्रशासनाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी नकली पनीर बनवित असल्याचे आढळून आले.
अन्न व औषध प्रशासनाने या कारखान्यातून १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ८९९ किलो नकली पनीरचा साठा जप्त करण्यात आला. तसेच, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ हजार रुपये किमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि साडेचार हजार रुपयांचे २८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण सुमारे ४ लाख २१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पनीर हा पदार्थ नाशवंत असल्यामुळे जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. तर जप्त करण्यात आलेल्या पनीरचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय सह आयुक्त संजय नारागुडे म्हणाले, सण, उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशी बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.