पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक देऊन फरार झालेला चालक व अपघातग्रस्त वाहन खेड पोलिसांनी ३६ तासांच्या आत पकडले आहे.
कानिफनाथ बबन कड (वय २४ रा. संतोषनगर ,वाकी ता खेड ) असे वाहनचालक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. बसमधून उतरून मंगल कार्यालयाकडे कामासाठी जाण्याकरिता रस्ता ओलांडणाऱ्या १७ महिलांच्या जमावाला या मोटारीने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात महिला चेंडूप्रमाणे हवेत उचलून रस्त्यावर आढळल्या यात दोन महिलांचा जागीच तर तीन महिला उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला होता. पोलिसांना वाहन चालकाबाबत कोणती माहिती उपलब्ध नव्हती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अज्ञात वाहनाचा वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली. ते अपघात घडलेल्या ठिकाणाहून चारही दिशेकडे शोध घेत होते.
दरम्यान, कानिफनाथ कड हा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हैद्रोस बच्चेवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे घराच्या कडेला वाहन लावून लपून बसला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट यांनी त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे माहितीच्या आधारे माग काढून त्यास ताब्यात घेतले आहे. खेड पोलिसांनी ३६ तासांच्या आत ही कामगिरी केली आहे.