पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आहे. अशीच हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच तिच्याकडून 7 लाख रुपये उकळले. या प्रकारानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला. हा प्रकार मार्च 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत हडपसर, हैदराबाद, हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड या ठिकाणी घडला आहे.
याप्रकरणी 31 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोहम्मद अबरार इब्राहिम शेख (वय 35, रा. बंजारा हिल्स, सय्यदनगर, आसिफ नगर, हैदराबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच फिर्यादीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. एवढचं नाही तर पीडितेकडून वारंवार 7 लाख रुपये देखील घेतले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली असता त्याने लग्न करण्यासाठी टाळाटाळ केली.
तसेच पैसे मागितल्यावर मारहाण केली. पीडितेला हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत.